पुणे - मनेसप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेतून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याचा राग आवळला. 3 मेपर्यंत हे भोंगे उतरविण्यासाठी त्यांनी जाहीर सभेतून इशाराही दिला आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. त्यानतंर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच, आमचे हात बांधले नसून जशात तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी शोभायात्रांवरील दगडफेकीसंदर्भात दिला आहे.
भगवी शाल पांघरूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी मारूतीची महाआरती केली. हनुमान जयंतीचा मुहूर्त व राज ठाकरे यांनी ‘तुमचे भोंगे काढा, अन्यथा आम्ही आमची हनुमान चालिसा लावू’ म्हणून दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर या महाआरतीला अभूतपूर्व गर्दी झाली होती. या महाआरतीनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भोंग्यांबद्दलची भूमिका स्पष्ट करताना तीच असल्याचं म्हटलं. तसेच, 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर, 5 जून रोजी अयोध्येचा दौरा असल्याचेही जाहीर केलं. त्यानंतर, जर आमच्या मिरवणुकांवर कोणी दगडफेक केली, तर आम्हीही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत, अशा शब्दात त्यांनी थेट इशाराच दिला आहे.
पुण्यात मारुतीची सांग्रसंगीत पूजा
भगवी शाल पांघरूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी मारूतीची महाआरती केली. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी दिलेली चांदीची गदा उंचावून ठाकरे यांनी या गर्दीला अभिवादन केले. राज यांनी कृतीतून बरेच काही दाखवून दिले. सहा वाजताची वेळ असताना ते साडेसात वाजता मंदिरात आले. मंदिरात जाऊन राज यांनी मारुतीची सांग्रसंगीत पूजा केली. आरती संपल्यावर लगेचच मंदिराच्या आवारात बसलेल्या सालसर मंडळाने हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. ते पूर्ण होईपर्यंत राज चौथऱ्यावर उभे होते.