प्राची कुलकर्णी -
पुणे : मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने आपला मोर्चा वळविला आहे. त्याच धर्तीवर राज ठाकरे शुक्रवारी (दि. ५ ) सकाळी 'अॅक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. आत्तापासूनच त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीत लक्ष घालत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये मनसे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात शहरातील पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. यावेळी मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे.
दरम्यान, मनसेने पुन्हा एकदा सेनेच्या सुरुवातीच्या धोरणांचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक मतदार यादीसाठी राजदूत नेमत त्यांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त मतदारांपर्यॅत पोहोचायचं टार्गेट पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सध्याचा परिस्थितीचा आढावा घेतानाच निवडुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येचा दौरा करणार आहेत. पक्ष पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गाने जात असतानाच भाजप मनसे युतीची चर्चाही सुरु झाली आहे. पण महापालिका निवडणुकांसाठी युती केल्यास पुण्यात पक्षाला फटका बसेल असं सांगत मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकार्यांनी मात्र एकला चलो रे चं धोरण स्विकारायची विनंती पक्षाध्यक्षांना केली आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितलं “ भाजपची महापालिकेचा एकहाती सत्ता आहे. त्यांच्याबरोबर गेल्यास आमच्या हाती काहीच लागणार नाही. म्हणून स्वतंत्र लढावे अशी भूमिका आम्ही मांडली आहे. पण याचा निर्णय मात्र अगदी निवडणुकी आधीच्या शेवटच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.”
दरम्यान, मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वाचा मात्र स्विकारतानाच सेनेच्या शाखांच्या धर्तीवर राज-दूतांची नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. भाजपच्या पन्नाप्रमुखांप्रमाणेच हे राजदूत काम करतील. दर आठशे लोकांमागे नेमलेल्या या राजदूतांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यॅत पोहोचायचा प्रयत्न करायचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. तसंच लवकरच या राजदूतांची नेमणुक पुर्ण करुन त्यांच्यासाठी एक शिबीर घेण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीत मनसे पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्यामुळे आनंदी असल्याचे सांगत आपल्यालाही अयोध्येला येऊ द्यावे ही विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे.