पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसली असून पुण्यात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेऱ्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात मनसेची सलग तिसरी बैठक पार पडली असून जाणीवपूर्वक त्याची कोणतीही वाच्यता केली जात नाही.
२०१४साली पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवणुकीत मनसेची संपूर्ण राज्यातून पीछेहाट झाली होती.इतकेच काय तर महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जनतेने मनसेला नाकारले होते.पर्यायाने ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र चार वर्षाची मरगळ झटकून ठाकरे पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी सिद्ध झाले आहेत. त्यासाठी त्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यात ठाकरे तीनदा पुण्यात आले असून त्यांनी शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात त्यांनी भोसले क्लबच्या सभागृहात बैठक घेतली होती. त्या बैठकीलाही फक्त शहर पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे समजते . एवढेच नाही तर रविवारी मुलुंड येथील महिलांचा रिक्षावाटपाचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी थेट पुणे गाठणे पसंत केले. सोमवारी सकाळपासूनच ठाकरे यांनी राजमहाल या निवासस्थानी भेटींचा धडाका लावला होता. यावेळी शहराध्यक्ष अजय शिंदे, महापालिका गटनेते वसंत मोरे यांच्यासह सर्व मतदारसंघांचे अध्यक्ष, विभागाध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष हजर होते. ठाकरे यांनी मागील भेटीत मागितलेल्या आकडेवारी, नकाशे, नावांची यादी या सर्व अभ्यासासह अनेक जण आणलेले कागदं वाढण्यात गढून गेलेले होते. स्वतः ठाकरे लहान लहान मुद्द्यांवर रस घेत असल्याचे कार्यकर्तेही कामाला लागले असल्याचे मत एका पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. इतकेच नव्हे तर ठाकरे यांनी पुण्यात घेतलेला रस बघता मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर खडतर आव्हान उभे करेल असा अंदाजही कार्यकर्त्याने वर्तवला.