पुणे : काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी सोमवारी (दि. १५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याने त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वतुर्ळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांच्या विरोधात राज्यभर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. नांदेड व सोलापूरमध्ये सभा घेत त्यांनी प्रचाराची दिशाच बदलून टाकली आहे. पुण्यात दि. १८ एप्रिल रोजी त्यांची सभा होणार आहे. या सभांचा थेट फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होणार असल्याची चर्चा आहे. मोहन जोशी यांनीही राज ठाकरे यांच्या भुमिकेचे स्वागत केले आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे हे रविवारी पुण्यातील त्यांची निवासस्थानी मुक्कामी होते. त्यामुळे जोशी रविवारीच त्यांना भेटणार होते. पण सोमवारी सकाळी दोघांची भेट झाली. सुमारे १० ते १५ मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी मनसेचे अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते. शहरात मनसेकडून स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. यापार्श्वभुमीवर ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. काँग्रेसकडून ही सदिच्छा भेट असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे.-----------
राज ठाकरे व मोहन जोशी यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 8:36 PM
राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांच्या विरोधात राज्यभर सभा घेणार असल्याचे जाहीर केले.
ठळक मुद्दे शहरात मनसेकडून स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली जाणार काँग्रेसकडून ही सदिच्छा भेट असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट