पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला असला, तरी ते महायुतीसाठी प्रचार सभा घेण्याची शक्यता कमी आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीच बुधवारी पक्षाच्या कार्यालयात बोलताना याचे सुतोवाच केले. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, तर कदाचित ते त्या सभेत सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
पक्षांतर्गत बैठकांसाठी म्हणून अमित ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांबरोबर संवाद साधताना त्यांनी मुंबईत उद्धवसेनेला एकही जागा मिळणार नाही, अशी खात्री व्यक्त केली. ते म्हणाले, मुंबईत त्यांच्याविरोधात वातावरण आहे. अमोल कीर्तीकर यांचा खिचडी घोटाळा समोर आला आहे. त्यांना सहानुभूती वगैरे काहीही नाही, उलट मुंबईकर मतदार त्यांच्याविरोधात आहेत. पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला तो काही विचार करूनच दिला असणार. त्यांच्या मनात सतत कार्यकर्त्यांचाच विचार असतो. लोकसभा निवडणुकीत जे मनसैनिक महायुतीच्या विरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमित यांनी दिला. वसंत मोरे यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानावा व महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असा सल्लाही अमित यांनी दिला.
मनसेचे नेते बाबू वागसकर, राज्य प्रवक्ते योगेश खैरे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, सरचिटणीस गणेश सातपुते व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बाबर यांनी शहराच्या वतीने अमित यांचे स्वागत केले. महायुतीच्या प्रचारात कसे सहभागी व्हायचे व अन्य काही गोष्टींचे नियोजन अमित यांनी केले. त्यानंतर ते नाशिकला रवाना झाले.
महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसेच्या पक्ष कार्यालयात जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेतली. पक्षांतर्गत बैठक सुरू असतानाच मोहोळ तिथे आले. त्यांची व अमित यांची काही वेळ चर्चा झाली. मोहोळ यांच्या मागे पुण्यातील सर्व मनसैनिक असतील, याची ग्वाही अमित यांनी त्यांना दिली, तसेच विजयासाठी शुभेच्छाही दिल्या.