पुणे : रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसेला (MNS) रामराम ठोकल्यानंतर पुण्यातील मनसेचं महिला नेतृत्त्व कमकूवत झाल्याचे बोलले जात होते. कारण गेल्या चौदा वर्षापासून मनसेला पुण्यात रुपाली पाटील यांच्यामार्फत बेधडक महिला नेतृत्त्व मिळालं होतं. मात्र आता मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले असता पुन्हा एकदा पक्षाचं महिला संघटन बळकट करण्याच्या हेतूनं त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
शहर महाराष्ट्र नवनिर्माण 'महिला' सेनेच्या शाखाध्यक्ष पदी १३० महिलांना राज ठाकरे यांच्या हस्ते आज नियुक्ती पत्र देण्यात आली. त्यानंतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपती बाप्पांची आरती केली. शहरातील पक्ष कार्यालयात ही नियुक्ती पत्र देण्यात आलीत.
मनसेला माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी पक्षातील कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडलं असल्याचं स्पष्ट केलं होतं. पक्षातील मनसेचे नेते किशोर शिंदे (kishor shinde) आणि बाबू वागसकर (Babu Wagaskar) यांच्यावर नाराज असल्याचं सांगत या दोघांनाही रिकामटेकडे असल्याची टीका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली होती.