पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. एखादा शब्द कुठून कसा तयार झाला, त्याचं उगमस्थान काय याबद्दलही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस या आडनावाबद्दलही अनोखी माहिती दिली.
फडणवीस या आडनावाचं उदाहरण दिलं. या आडनावाचा उगम सांगताना राज ठाकरे म्हणाले, फडणवीस हे आडनाव फर्दनवीस या पर्शियन शब्दावरुन आलेलं आहे. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा. कागदावर लिहिणारा म्हणजे फर्दनवीस. पण मग नंतर फडावर लिहिणं आलं. आणि म्हणून ते फडणवीस असं झालं. आडनावं अशी असतात. या गोष्टी कुठून आल्या, कशा आल्या. आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस आहे.
पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं, शाखा अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं असा त्यांचा कार्यक्रम आहे. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेटही घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
गेल्या आठवड्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी इतिहासातील काही शब्दांबद्दल चर्चा झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी मराठीतले काही शब्द, इतिहासातले काही विशिष्ट शब्द ते तसेच का वापरावेत याबद्दल जाणून घेतल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सांगितलं की, त्या वेळची मराठी वेगळी होती. ळ आणि ल मध्ये फरक होता. किंवा कैसी शब्दाला त्यावेळी कैंचि असं लिहिलेलं आहे. मग तो शब्द आत्ता वापरावा का? आपल्याला माहित असलेले काही फारसी शब्द आहे. आडनावांच्या बाबतीतही असंच काही आहे.