पुणे: मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेचे आंदोलन सुरू असून, पहाटे मशिदींसमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. त्याविरोधात पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील अनेक ठिकाणी मनसैनिकांनी सक्रिय होत हनुमान चालीसा लावली. राज्यभरात अनेक ठिकाणी मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. मुंबईसह राज्यातील मनसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, धरपकडही सुरू आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये गेले काही दिवस चर्चेत असणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) नॉट रिचेबल असल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
मनसेकडून राज्यात सर्वत्र मशिदींसमोर भोंगे लावण्यात येत असताना पक्षाचे नेते वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाही. उलट मंगळवारपासून वसंत मोरे नॉटरिचेबल झाले आहेत. राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेला पहिल्यांदा वसंत मोरे यांनीच विरोध दर्शवला होता. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर वसंत मोरे नाराज होते. या मुद्द्यावरून मनसे पक्षातच दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले होते.
भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत
या नाराजी नाट्यानंतर वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. परंतु, भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. मंगळवारपासून ते नॉट रिचेबल आहेत. वसंत मोरे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सुरुवातीला राज ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नव्हता. नंतर मात्र राज ठाकरे यांनी वसंत मोरेंची भेट घेतली.
दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणच्या मशिदींमध्ये भोंग्याविना अजान घेण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधलकी जपल्याबाबत मनसेकडून त्यांचे आभारही मानण्यात आले. मुस्लिम बांधवांच्या या भूमिकेचे कौतुकही मनसे नेत्यांनी केले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील मशिदींबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.