पुणे : राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याला प्रकृती ठणठणीत नसल्याचे कारण देऊन स्थगित केल्याची चर्चा समाजमाध्यमांवर होऊ लागली होती. यावर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. राज यांची प्रकृती ठणठणीत असून दौरा रद्द करण्याचे ते कारण नाही. असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. यावेळी बाबू वागस्कर, साईनाथ बाबर आणि आशिष साबळे पाटील उपस्थित होते.
पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मागील महिन्यात ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानंतर दौऱ्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरुवात झाली. महाराष्ट्रातून हजारो मनसैनिक या दौऱ्यासाठी जाणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यातच मध्यंतरी उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण यांनी अयोध्येत राज ठाकरेंना पाऊल ठेऊन देणार नाही. असा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश वासियांची माफी मागितल्याशिवाय आम्ही येऊ देणार नसल्याचे ब्रिजभूषण म्हणाले आहेत. त्यातच राज ठाकरेंनी पुण्यात सभेचे आयोजन केले आहे. पण काही करणास्तव त्यांनी अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिली आहे. त्याबाबत ते पुण्यातील सभेत बोलणार असल्याचे ट्विट करून सांगितले आहे.
वागस्कर म्हणाले, साहेबांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. अयोध्या दौरा रद्द कारण्यामागचे कारण आरोग्यसंदर्भात नाहीये. ते या दौऱ्याबाबत पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे. ब्रिजभूषणबाबत बोलताना ते म्हणाले, कोणत्याही खासदाराने अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून राज ठाकरे त्यांना घाबरून दौरा रद्द करणार नाहीत. ते जरी आम्हाला अडवणार असतील. तरी त्या भागातील बाकिचे आमच्या पाठीशी आहेत, ते आम्हाला पत्र पाठवून बोलवून घेतायेत. आता दौरा स्थगित आहे. साहेबांचा आदेश मिळताच दौऱ्याची जोरदार तयारी सुरु होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, आम्ही दौऱ्यासाठी नावनोंदणी मोहीम सुरु केली आहे. दौरा होणार हे निश्चित आहे. तो आता फक्त स्थगित करण्यात आला आहे. पुढची तारीख साहेब लवकरच कळवतील. आम्ही सर्व मनसैनिक दौऱ्यासाठी तयार आहोत. यावेळी नावनोंदणी अशीच सुरु राहील असेही त्यांनी सांगितले.