पुणे - ओबीसींचं राजकीय आरक्षण, पाऊस आणि इतर कायदेशीर पेचप्रसंगामुळे राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच, आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही २ वर्षांवर आल्या आहेत, त्यामुळे, सगळेच पक्ष पक्षबांधणीला निघाले आहेत. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भाचा दौरा केल्यानंतर आज ते पुण्यात बैठक घेत आहेत. यावेळी, नगरसेवक वसंत मोरेंच्या नेतृत्वात काही जणांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. तर, वसंत मोरेंना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात बारामती लोकसभेसाठी वसंत मोरे यांना निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता, वसंत मोरेंनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी काय रणनिती आहे, हे सांगितलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पुणे येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्ह्यातील काही जणांचा मनसेत प्रवेश झाला. यावेळी छावा ग्रुप पुणे चे संस्थापक अध्यक्ष संतोष अप्पा आखाडे यांनी मनसेत प्रवेश केला. त्याचबरोबर काही पक्षाच्या कार्यकर्त्यांची विविध पदावर नेमणूकही केली. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
माझ्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. आज आप्पा आखाडे, संतोष आखाडे यांचा प्रवेश झाला, त्यांना जबाबदारीही देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदासंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे, या मतदारसंघात ७९५ गावे असून मी या प्रत्येक गावात मनसेची शाखा काढणार आहे, त्यासाठी संतोष आप्पाला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज पाचही प्रवेश हे बारामती मतदारसंघातील आहेत, असेही त्यांनी म्हटले. खडकवासला, भोर, वेल्हा याठिकाणाहून काही हे प्रवेश झाले आहेत.
यापूर्वी केली होती फेसबुक पोस्ट
वसंत मोरेंची बारामती लोकसभा निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ...कारण मराठ्याची जात कधी मागं पुढं बघत नाय...आणि हो बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो, त्यात भोर , वेल्हा , मुळशी , पुरंदर , हवेली , दौंड , इंदापूर आणि पुणे शहर हे ही आहे बरं का...म्हणून तर म्हणलो मी येतोय..., असं वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.