"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 02:46 PM2022-12-02T14:46:12+5:302022-12-02T14:54:35+5:30

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी...

Raj Thackeray is being duplicitous, Ajit Pawar's attack on 'that' allegation | "राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

Next

बारामती (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीय राजकारण सुरु झाल्याचा राज ठाकरे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. ‘पवारसाहेबां’चे नाव घेतलं की ती बातमी होते. राज ठाकरे  ज्यावेळी ‘साहेबां’ची मुलाखत घेताना त्यांच्याबद्दल काय बोलत होते, ते सर्वांना माहिती आहे. तरीही ते दुटप्पी वागत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्षे ओळखतो. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब असल्याचे अजित पवार म्हणाले.

कर्नाटक सरकारने जत तालुक्याला पाणी उपलब्ध करुन दिल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आपण अनेकदा कर्नाटकमध्ये दूधगंगेच पाणी सोडलेलं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आपण एकमेकाला तशा प्रकारची मदत करत असतो. कधीकधी आपण सोलापूरला उजनीतून प्यायला पाणी सोडतो. एका बाजूला महाराष्ट्रीयन दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. उजनीचं पाणी कर्नाटकवाले तिकडच्या बाजूने नदीची साईड येते, तिकडं उचलत असतात. आपल्या बाजूचे आपल्या बाजूने उचलत असतात त्याच्यात एवढं लगेचच काही त्याला वेगळं स्वरूप देण्याचा काही कारण नसल्याचे पवार म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत पवार म्हणाले, आत्ता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काही राज्यांमध्ये तशा प्रकारचा सुतोवाच केलेला आहे. स्वत: राजनाथ सिंग याबाबत बोलले. सुतवाच करणे वेगळं आणि अंमलबजावणी करणे वेगळं. कदाचित त्यांचा असा प्रयत्न असेल, अशा प्रकारचा आपण ‘स्टेटमेंट’ केल्यानंतर समाजातुन काय प्रतिक्रिया येते. बऱ्याचदा राज्यकर्ते एखादा निर्णय घ्यायचा असल्यास त्यावेळी एखाद्या स्टेटमेंट असं करतात,असे पवार म्हणाले.

महिलेला  मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, कुणाला काय वाटावं, तो त्यांचा त्याचा अधिकार आहे. उद्धवजींच्या मनामध्ये तसा आला असेल म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं असेल. १४५ चा  बहुमत आकडा जो मिळवु शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो,असे पवार म्हणाले.

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी-
 राज्यापालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाचा सगळ्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. त्याबद्दल राज्यकर्ते लक्ष देताना दिसत नाही. तेवढ्यापुरते काहीतरी उत्तर देत वेळ मारून नेतात. वास्तविक या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. जनतेच्या दैवता बद्दल असं कोणी उठसूट वक्तव्य करणं, हे महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर संबंधित वरीष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

Web Title: Raj Thackeray is being duplicitous, Ajit Pawar's attack on 'that' allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.