मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आज सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर आयोजित व्याख्यानात तरुण पिढीला राजकारणात येण्याचं आवाहन केलं. राजकारण वाईट नसून ते नासवलं जात आहे. सध्या राजकारणाला फाटे फुटत आहेत. आयुष्यात काहीही घडत नाही म्हणून राजकारणात यायचं असं चित्र सध्या झालं आहे. ते बदलणं तुमच्याच हातात आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंना व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये उपस्थित असणाऱ्या एकाने विचारले की, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया, असे तुम्ही आत्मविश्वासाने सांगणारे पहिले राजकारणी होतात. तुम्ही विकासाची ब्लू प्रिंट देखील साद केली होती. 'राज'विचार आम्हाला आवडतो. परंतु मला खंत वाटतेय की राज्यातील जनतेने सर्व राजकीय पक्षांना एकहाती सत्ता दिली. मात्र राज ठाकरेंना दिली नाही, ती जनता कधी देईल, असा प्रश्न आहे.
तरुणवर्ग राजविचारांवर प्रेम करतो. मात्र हा विचार पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहचवण्यात कुठेतरी अपयशी पडताय, असं तुम्हाला वाटतं का?, असा सवाल उपस्थित असणाऱ्याने विचारला. यावर अनेकदा यशाला उत्तर नसतं आणि परभवालाही उत्तर नसतं. २०१४ साली जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यावेळी भाजपाचे मोठ्या प्रमाणात खासदार देशभरातून निवडून आले होते. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांना भाजपाला मतदान करण्याबाबत पटवलं होतं, असं नव्हतं. एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीवरती विचार करुन लोक मतदान करतात. नागरिकांना नरेंद्र मोदींकडे बघून स्थानिक आमदार आणि खासदारांना मतदान केलंय, आणि हा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे. मग माझे विचार जर पटत असतील, तर माझ्याकडे तर बघा...., असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य हे राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारं दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असतं. मग राजकारण तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नव्या पिढीनं राजकारणात येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर काहीही बरळतात", असं राज ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"