पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा होत आहे. ठाणे आणि औरंगाबाद इथं झालेल्या सभेमध्ये, राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा गजर केला होता. मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसंच, ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचंही जाहीर केलं होतं. मात्र, हा दौरा अचानक स्थगित करण्यात आला आहे. त्यावरून मनसेतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, मनसेनं मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात मनसेनं पुकारलेलं आंदोलनही थंडावलं आहे. अन्य राजकीय पक्षांकडून मनसेची खिल्ली उडवली जातेय. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिलेल्या धमक्यांना मनसे घाबरली का?, असा खोचक प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे पुण्यात काय बोलतात, याकडे मनसैनिकांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या आधीच्या दोन सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि खास करून शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. मात्र, शिवसेनेबद्दल त्यांची भूमिका काहीशी सौम्य राहिली आहे. याउलट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'केमिकल लोच्या झालेला मुन्नाभाई' म्हणत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यामुळे आजच्या भाषणात राज यांचं टार्गेट कोण असेल?, उद्धव ठाकरेंना ते प्रत्युत्तर देणार का? औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींबद्दल ते काही बोलणार का, याबद्दलही उत्सुकता आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देः
>> निवडणुका नाहीत, मग उगाच कशाला भिजत भाषण करा? म्हणून मग बंद सभागृहात सभा घेऊ म्हटलं.
>> पायाचं दुखणं सुरू आहे, कमरेला त्रास होतोय. १ तारखेला माझी 'हिप बोन'ची शस्त्रक्रिया आहे.
>>अयोध्या दौरा तूर्तास रद्द केला. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले.
>> अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे सुरू झालं. मी बघत होतो. मला मुंबईतून, दिल्लीतून, उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती.
>> हा सगळा ट्रॅप, सापळा असल्याचं लक्षात आलं आणि आपण यात अडकलं नाही पाहिजे, असा विचार केला.
>> सगळी रसद पुरवली गेली, ती महाराष्ट्रातून. ज्यांना अयोध्या वारी खुपली होती, त्यांनी हा आराखडा आखला.
>> राम जन्मभूमीचं दर्शन मला घ्यायचं होतंच, पण जिथे कारसेवकांना मारलं त्या जागेचंही दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात अनेकांना भावना समजत नाहीत.
>> मी समजा जायचं ठरवलं असतं, अनेक हिंदू बांधव आले असते. जर तिथे काही झालं असतं, तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं. तो ससेमिरा तुमच्या पाठीशी लावला जाऊ नये म्हणून दौरा स्थगित. हा सगळा ट्रॅप होता.
>> एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. या सगळ्या गोष्टींना अनेक पापुद्रे. ही महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिथे सापडली असती, ती मला जाऊ द्यायची नव्हती.
>> चार शिव्या खायला तयार, टीका सहन करायला तयार, पण पोरं नाही अडकू देणार!
>> राज ठाकरेंनी माफी मागावी याची आत्ता आठवण झाली? एवढ्या वर्षांनी?>> ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाउडस्पीकर झोंबले त्यांचं हे राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
>> मातोश्री बंगला काय मशीद आहे का, तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणायला? जे लोक मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला आले, त्यावरून एवढं काही घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी. 'पक पक पक पक' पुरतंच हिंदुत्व.
>> मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा आहे. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. तुम्ही वॉशिंग पावडर विकताय का? हिंदुत्वाचे रिझल्ट हवेत लोकांना. आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना रिझल्ट देतो.
>> रेल्वे भरतीवेळी आपले लोक रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलायलाच गेले होते. आपल्या पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली आणि तिथून सगळं प्रकरण सुरू झालं.
>> राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो असं म्हणणाऱ्यांनी मला असं एक आंदोलन दाखवावं.
>> उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? मराठीच्या मुद्द्यावर असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर.
>> परवा म्हणाले, संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना?... अरे तू कोण आहे? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?
>> मागे मी समान नागरी कायदा करण्याबाबत बोललो होतो. आज मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की, लवकरात लवकर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा.
>> आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत. औरंगजेब हा जर शरद पवारांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलायचं? तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?
>> शिवसेनेला एवढीही अक्कल नाही की तुम्ही कोणाबरोबर राहताय? शरद पवार जे बोलताहेत, ते बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताहेत.
>> भोंग्याचा विषय सुरू झाला आहे तर एकदाच तुकडा पाडून टाका.
>> जो कायदा पाळायला सांगतो, त्याला नोटिसा पाठवल्या जातात. जो कायदा मोडतो त्याच्याशी चर्चा केल्या जातात. राज्यातल्या २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा आल्या.
>> दोन-चार दिवसांत एक महत्त्वाचं पत्र देणार आहे. ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे.
>> पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी १३ अटी, कुठल्याही प्रकारची चिथावणी न देण्याची ताकीद; उल्लंघन झाल्यास कारवाई
>> गणेश कला क्रीडा रंगमंच इथे सकाळी १० वाजता राज ठाकरेंची सभा
>> शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार; शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंची माहिती
>> राज ठाकरेंच्या पुण्यातील घराबाहेर कडेकोट सुरक्षा, थोड्याच वेळात सभेसाठी निघणार, राज्याच्या विविध भागांतून मनसैनिक पुण्यात
>>लेखः महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय?
>> राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचा टिझर
>> नाराज वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभेला येणार का?
>> मनसे नेते वसंत मोरे सभागृहात पोहोचले, नाराजी आणि 'वेगळा विचार' करत असल्याच्या चर्चांवर पडदा