पुणेः दूध दरवाढीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी राज्य सरकार दोषी आहे, परराज्यातील अमूल-बिमूल दूध महाराष्ट्रात घुसवण्याचे हे धंदे सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सध्या गुजरातच महाराष्ट्र चालवत असल्याचा टोला हाणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
मराठवाडा दौऱ्याला सुरुवात करताना राज यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, वैद्यकीय शिक्षणात महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, शिवस्मारकांची उंची या विषयावर त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्देः
>> दूध दरवाढीसाठी आंदोलन होणार असल्याचं राज्य सरकारला माहीत होतं, तर त्यांनी आधीच बैठक का बोलावली नाही?
>> संपूर्ण राज्यच हल्ली केंद्र सरकार चालवतंय, म्हणून कुणीही काहीही करत नाहीए का?
>> गुजरातमधील अमूल-बिमूल महाराष्ट्रात घुसवायचे धंदे सुरू आहेत.
>> छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मी विरोध केला होता, कारण महाराजांचे गड-किल्ले यावर खर्च करायला हवा. ती खरी संपत्ती आहे.
>> महाराष्ट्रात इतकी वैद्यकीय महाविद्यालयं असताना जर आपल्याच मुलांना तिथे प्रवेश मिळत नसेल तर त्यांनी कुठे जायचं?
>> मुलं होरपळून निघत असताना कोणताही आमदार, खासदार काहीही करत नाही, हे संतापजनक आहे.