पुणे-
पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले. यात राज ठाकरे यांनी तरुणांनी राजकारणात यायला हवं आणि राजकारण कसं प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे यावर आपले विचार मांडले. तसंच नवं काहीतरी करु पाहणाऱ्यांनी राजकारणात यायला हवं, तरच राजकारणातील वातावरण बदलेल असं म्हटलं. राजकारण वाईट नाही, पण आता ते नासवलं जात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
"मी त्यांना राजकारणात आणणारच...", राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं, मनसे अध्यक्षांना कुणाची भुरळ?
राज ठाकरेंनी आपल्या भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांनाही दिलखुलासपणे उत्तरं दिली. यात एका महिलेनं राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत गृहिणींनाही राजकारणात यावसं वाटतं. पण त्यांच्यासाठी छोट्या पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन दिले तर बरं होईल असं विचारलं. त्यावर राज ठाकरे यांनी संबंधितांना तुमची नावं आणि मोबाइल क्रमांक लिहून आयोजकांकडे द्या, मी तुमच्याशी बोलेन असं आश्वासन दिलं. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले.
...अन् तेच लोक घरी जाऊन 'बिग बॉस' बघताततुमची भाषणं ऐकून मराठी माणूस प्रेरित होतो. पण त्या भाषणापुरताच असतो. घरी गेला की नॉर्मल होतो, असं त्याच महिलेनं राज ठाकरे यांना म्हटलं. त्यावर राज ठाकरे यांनी हजरजबाबीपणे 'हो...घरी जाऊन बिग बॉस बघत बसतो', असं उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नव्हेराजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असं राज ठाकरे म्हणाले.
विधानसभेतील चर्चा ऐकवत नाहीत राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य हे राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारं दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असतं. मग राजकारण तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नव्या पिढीनं राजकारणात येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर काहीही बरळतात", असं राज ठाकरे म्हणाले.