पुणे- जनतेचा विश्वासघात करून आलेलं हे सरकार फार काळ चालणार नाही. हे सरकार म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात आहे. पक्षांतर करणाऱ्या अनेकांचा या निवडणुकीत जनतेने पराभव केला. जनतेला अशा गोष्टी आवडत नसताना अभद्र आघाडी करून सरकार बनवणे हे राज्याचे दुर्दैव आहे. या लोकांना पुढील निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. अशा प्रकारची प्रतारणा भाजपाने केली, शिवसेनेने केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचारायलाच नको, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो. यांच्या तंगड्या कुठे अडकतात हे पाहायचं आहे. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धतीच अजून कळेना, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. जे काही चालू होतं ते बघून माझीच नव्हे तर महाराष्ट्राची वाचा खुंटली होती. 23 तारखेच्या मनसेचा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आहे. 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईला पार पडणार आहे. तिथे जे काही बोलायचे ते मत मांडेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे. असले कायदे आणून गोंधळ घालायची गरज नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.