पुणे : राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत. तसेच काही दिवसात राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. याबाबत देखील नियोजन करण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे. त्यातच मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे वसंत मोरे यांना फोन करून बोलावलं असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
भोंग्याच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. भोंग्याच्या आंदोलनातही मोरे सहभागी नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले. पुण्यात रविवारी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मनसे कोअर कमिटीच्या पदाधिकार्यांसहित मेळावा आयोजित केला होता. त्या कोअर कमिटीच्या निमंत्रण पत्रिकेत वसंत मोरे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षातून डावललं जातंय असं मोरे म्हणाले होते. उद्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी वसंत मोरे यांना फोन करून बोलावलं आहे, या रविवारी झालेल्या मेळाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुढील आठवड्यत राज ठाकरेंची सभा
पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार आहे. याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले आहे.
हिंदूजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पुणे शहरात होणा-या सभेचे आयोजन मे महिन्याच्या २१ ते २८ तारखेच्या दरम्यान पुणे शहर मनसे कडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीकोना तुन तसेच सभेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सुचने नुसार सर परशुरामभाऊ महाविदयालय चे मैदान निवडत आहोत. तरी सदर कामी आपण योग्य त्या सुचना संबंधीत यंत्रणा व सर परशुरामभाऊ महाविदयालय प्रशासन यांना दिल्यास आम्हाला सभेचे नियोजन करण्यास सहकार्य होईल तरी सदरबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.