पुणे - मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात या केवळ 2.5 ते 3 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या सभागृहात ही सभा पार पडली. राज ठाकरेंचं सकाळी 11.23 वाजता मंचावर आगमन, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे आणि राज ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी अयोध्या दौऱ्या रद्द करण्याचे कारण या सभेत सांगितले. तसेच, काही टिकाकारांचा समाचारही घेतला. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला अनेक सवाल केले. त्यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला.
Raj Thackeray: 'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सभेत औरंगाबादला संभाजीनगर करायची गरजच काय, असे म्हटलं होतं. त्यावरुन, उद्धव ठाकरेंना फटकारले. तुम्ही कोण, तुम्ही सरदार वल्लभाई पटेल आहात की, महात्मा गांधी, असा सवाल राज यांनी विचारला. तसेच, राज ठाकरेंचं एकतरी आंदोलन फेल झाले का, सगळी आंदोलने पूर्णत्वाला नेली आहेत. माझा उद्धव ठाकरेंना एक सवाल आहे. तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का?. मग ती मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर असेल, असे म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला.
आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत, असंही राज यांनी म्हटले. एमआयएम महाराष्ट्रात वाढविण्याचं काम यांच्या राजकारणामुळेच झालं. बघता बघता एमआयएमचा एक खासदार तिथं औरंगाबादेत झाला. शिवसेनेचा खासदार पडला, असे म्हणत राज यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले.
गुजरातमध्ये कोण माफी मागणार?
उत्तर प्रदेशमधील बृजभूषण सिंह यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. अयोध्या दौऱ्याआधी, मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता १२-१४ वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.