पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे या गुरुपौर्णिमा मेळाव्यात मनसेच्या शिष्यांना त्यांच्या गुरूकडून कोणते धडे मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे वगळता ठाकरे यांनी बाकी महाराष्ट्रावर फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी मनसेची ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. या मेळाव्यात ते शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर बोलतील असा अंदाज मनसेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्या व्यतिरिक्त या आठवड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील उंचीचा मुद्दा,पंढरपूर पूजेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका यावरही ते बोलू शकतात. मागील आठवड्यात पुण्यात बोलताना ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी'चा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच हा मेळावा कार्यकर्त्यांसाठी असल्याने आणि मनसेचे बहुतेक कार्यकर्ते तरुण असल्याने या मुद्यावरही ते भर देतील.
सध्याच्या घडीला मनसेची स्थिती फार भक्कम नसली तर मराठा आरक्षण आणि मराठीचा मुद्दा यावर ठाकरे यांचे मत महत्वाचे ठरणार आहे. पक्षाला मराठवाड्यात जम बसवायला असेल तर तिथले प्रश्नही त्यांना समजून घ्यावे लागणार आहेत. मनसेचे अनेक मेळावे मुंबईत होत असतात. पण मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांना मध्यवर्ती असलेल्या पुणे शहराची निवड त्यांनी केली आहे. या मेळाव्याची शहरात जोरदार तयारी सुरु असून जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे येतील यासाठी नेते प्रयत्नात आहेत. शहरात या मेळाव्याची चर्चा सुरु व्हावी म्हणून चौकाचौकात फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेचे इंजिन आता कोणावर धडकणार हे येत्या शुक्रवारी स्पष्ट होईल.