पुणे - आपल्या रोखठोक वक्तव्य आणि स्वभावासाठी प्रसिद्द असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. पण यावेळी राज ठाकरेंना वेगळ्या म्हणजेच मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी त्यांच्यासमोर असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. पुण्यात 3 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने ही मुलाखत रंगतदार होणार यात काही प्रश्न नाही. लोकांनाही या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे.
शरद पवार कधीच आपली राजकीय खेळी उघड करत नाहीत. शरद पवार पुढच्या क्षणाला कोणता डाव खेळतील हे त्यांच्या सहका-यांनाही माहित नसतं असं म्हणतात. दुसरीकडे आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध असणारे राज ठाकरे. आपल्याला जे बोलायचं आहे ते समोरच्याला थेट आणि स्पष्ट सांगणं हा त्यांचा स्वभाव. अनेकदा कोपरखळी मारत ते आपला मुद्दा मांडतात. आता हे दोन्ही नेते समोर आल्यानंतर काय धम्माल उडेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे.
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर याआधी अनेक मुलाखती झाल्या आहेत. मात्र या मुलाखतींमध्ये नवीन असं काहीच नव्हतं. लोकांना आवडेल किंवा त्यांच्या लक्षात राहिल अशी मुलाखत व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंचं नाव सुचवल्यानंतर सर्वांनी त्यावर एकमत दर्शवलं. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अखेर 3 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.
महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न फक्त राज ठाकरेंना माहित असतील. हे प्रश्न ऐनवेळी मुलाखतीदरम्यान विचारले जातील, ज्याबद्दल शरद पवारांना काहीच कल्पना नसेल. त्यामुळे शरद पवारांचा हजरजबाबीपणा पाहण्याचीही एक संधी मिळणार आहे. आता आपल्या प्रश्नांनी राज ठाकरे शरद पवारांना कैचीत पकडण्यात यशस्वी ठरतील का हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.