पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. पण पोलीस प्रशासनाकडून ठाकरे यांच्या सभेला अद्याप परवानी देण्यात आलेली नाही. उलट येत्या ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र मनसैनिकांकडून सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. मनसेने औरंगाबाद सभेचे मोठमोठे बॅनरही छापले आहेत. औरंगाबादला जाण्याअगोदर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातूनच या सभेचे नियोजन ठरणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कोअर कमिटीच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.
मनसेच्या वतीने महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद येथील सभा आणि ३ मेला राज्यातील सर्व मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमितताने पुण्यात शहर कोअर कमिटी बैठक पार पडली. बैठकीत येत्या ३ मेला पुण्यात होणाऱ्या महाआरतीसंदर्भात देखील नियोजन करण्यात आले आहे. महाआरतीसाठी परवानगी मिळावी म्हणून शहरातील पोलिस ठाण्यात पत्र देण्याचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली असून तो दौरा कसा असणार, त्यांच्यासोबत कोण कोण जाणार, यासंदर्भातही चर्चा झाली.
औरंगाबादच्या सभेला ते पुण्यातून रवाना होणार
राज ठाकरे येत्या २९ आणि ३० एप्रिलला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर ते औरंगाबादच्या सभेला पुण्यातून रवाना होणार आहेत. पुण्यात झालेल्या मनसेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्या औरंगाबादच्या सभेच्या नियोजनावर चर्चा करत सभेची रणनीती ठरविण्यात आली आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.