पुणे: राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी - मार्चमध्ये होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या भाजप पक्ष पुणे महापालिकेत सत्तेत आहेत. पुणे महापालिका निवडणुकांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
"निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याचे नियोजन नंतरच करण्यात येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यावेळच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे कोणासोबत युती करायची याचा निर्णय घेईल." असं ते म्हणाले आहेत. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने युतीबाबत काही बोलणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मनसेच्या नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघाला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा अशा सर्वच पक्षांचे नेते सामोरे गेले होते. सर्वांनी त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा मान्य केला होता. आजही तोच सूर आळवला जात आहे. मग नेमके अडले आहे कुठे असा सवाल त्यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाच्या सत्ता काळात ईडीचा गैरवापर झालेला आहे. भाजपाकडूनही आत्ता गैरवापर केला जात आहे. तपास यंत्रणा म्हणजे बाहुल्या नाहीत. आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना संपविण्याकरिता ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करणे चूकीचे आहे. ज्यांनी प्रत्यक्षात गुन्हे केलेत ते मोकाट सुटलेत खडसेंवर कारवाई झाली तरी त्यांची सीडी बाहेर आलेली नाही. तुमच्याकडे ईडी असेल तर मी सीडी लावीन असे खडसे म्हणाले होते. त्यांच्या ‘सीडी’ची मी वाट पहात असल्याचे ठाकरे म्हणाले.