पुणे : केवळ निवडणुका लढविणे म्हणजे राजकारण नाही. राजकारण आपल्या सर्वांच्या भविष्याशी निगडित आहे. अनेक वकील, डॉक्टर, कलाकार यांसह विविध पेशांतील व्यक्तींनी राजकारणात येऊन आपले योगदान दिले आहे. राज्याचे राजकारण सध्या चुकीच्या माणसांच्या हाती गेले आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर ठाकरे बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, अतुलकुमार उपाध्ये उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘दैनंदिन आयुष्यात लागणारे दूध, पाणी, वीज या गोष्टींच्या दरापासून शाळेचा अभ्यासक्रम, कोणत्या शहरात कोणता प्रकल्प आणायचा हे सर्व राजकारणी ठरवतात. यावर आपण कोणतेही भाष्य न करता निमूटपणे राजकारण्यांचे निर्णय मान्य करतो. हे चित्र बदलण्यासाठी केवळ घरात बसून बोटे न मोडता जाणत्या नागरिकांनी राजकारणात यावे. मी अशा लोकांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.’’ महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली तर आपण कुठं फरपटत चाललो आहोत आणि कोणामुळे चाललो आहोत, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
बाबा आमटे यांचे नातू एकदा मुंबईत मला भेटायला आले होते. त्यांना ‘मुंबईत काय काम काढले?’ म्हणून विचारताच ‘संस्थेचा मंजूर निधी अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी मंत्रालयात आलोय’, असे उत्तर दिले. बाबा आमटेंच्या नातवाला अशा किरकोळ कामांसाठी मंत्रालयात झगडा करावा लागतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे समाजकार्याला राजकारणाची धार हवी. त्याकरिता सुज्ञांनी राजकारणात आले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.
मध्यम वर्गाचा दबाव राहिला नाही
मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाचा राजकारण्यांवर दबाव राहिला नाही. हाच वर्ग परदेशात स्थायिक झाला असून, राजकारणाला गलिच्छ समजत आहे. लोकप्रतिनिधींना जनतेची भीती उरलेली नाही. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पाहता अशा लोकांनी राजकारणात यावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.