पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह आहे, मात्र त्याचे मतात रूपांतर किती होईल, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल, असेही ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश करत आहे. पुढच्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदाच्या जवळपास दिसणार नाहीत. लोकशाहीने निवडणुकीत भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यासाठी निवडणुकीला उभे राहण्याची गरज नाही. त्यामुळे राज आमच्यासाठी सभा घेत असतील तर ते त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.
या दरम्यान त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची माहिती दिली. ते म्हणाले की, हा जाहीरनामा काँग्रेसचा नसून पक्षाचा आहे. या जाहीरनाम्यात लोकांनी व्यक्त केलेल्या सूचना, निवेदन, मागण्या यानुसार बनविण्यात आला आहे. आम्ही त्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार आहोत.जाहीरनामा तयार करतानाच शक्य असेल त्याच मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे. महाराष्ट्राचा जाहीरनामा वेगळा करण्यात येणार असून त्यात स्थानिक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.राष्ट्रीय जाहीरनाम्यात शिक्षण, न्याय, माहितीचा अधिकार अशा विविध मुद्द्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा निवडणूक व्यक्तिकेंद्रित करत आहे. ही निवडणूक वर्षाला सहा हजार विरुद्ध महिन्याला सहा हजार अशी होईल. भाजपा जाहीरनाम्याला जाहीरनामाही म्हणू शकत नाही. भाजपा प्रवेश विषयावर विखेंशी बोलणं नाही, मला कोणतीही माहिती नाही.