पुणे : स्वातंत्र्यानंतर मराठी चित्रपट हा संगीत बारीकडे वळला. त्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे तमाशा, असे चित्र निर्माण झाले. मात्र, राजाभाऊ परांजपे यांनी मराठी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले. दिग्दर्शन, लेखन व अभिनयाने मराठी चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्या जीवनाचा व संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यांनी केले.राजाभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना बुधवारी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते म्हणाले, ‘‘राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी चित्रपटाला तारले. राजाभाऊंचे कर्तृत्व मोठ्या कष्टात गेले. त्यांचे चित्रपट बारीक दृष्टिकोनातून बघताना त्यांनी किती मेहनत घेतली असेल, किती अभ्यास केला असेल, याची जाणीव होते. त्या काळी ‘पॉल म्युनी’सारख्या अभिनेत्याबरोबर राजाभाऊंची तुलना व्हायची. चित्रपटसृष्टी हा भूलभुलैया आहे असे म्हटले जाते. मात्र, तो भूलभुलैय्या नाही, तर चित्रपट माणसाचे संपूर्ण जीवन बदलून टाकतो हे राजाभाऊंच्या चित्रपटातून कळाले व माझ्याही जीवनात बदल झाला.’’ गोखले म्हणाले, ‘‘आजचा मिळालेला पुरस्कार हा सन्मानाचा असून तो मी जपून ठेवणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागचा हेतू काय, हे कसे महत्त्वाचे असते हे जाणून घ्यायचे असेल तर बिमल रॉय, राज कपूर यांचे जसे चित्रपट पाहिले जातात, तसेच राजाभाऊंचे चित्रपट बघणे हे नवीन दिग्दर्शकांचे काम आहे.’’ (प्रतिनिधी)
राजाभाऊंनी चित्रपटाला संगीत बारीतून बाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 1:08 AM