--
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजाराम विठ्ठल काळभोर यांची, तर उपसरपंचपदी ज्योती अमित काळभोर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माधव काळभोर यांच्या गटातील महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटांत झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोरची निवडणूक चर्चेत होती. या निवडणुकीत माधव काळभोर व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सतरापैकी तेरा जागा जिंकून ग्रामपंचायतीवर एकहाती झेंडा फडकावला होता.
प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेलला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा कृषी अधिकारी अमित ननवरे यांच्या उपस्थितीत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच व उपसरपंचपद निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंच पदासाठी अनुक्रमे राजाराम काळभोर व ज्योती काळभोर या दोघांचेच उमेदवारी अर्ज आल्याने ननवरे यांनी लोणी काळभोरच्या सरपंच राजाराम काळभोर यांची तर उपसरपंचपदी ज्योती काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला.
पॅनेलचे प्रमुख माधव काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, साधना बॅँकेचे सुभाष काशिनाथ काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, उद्योजक मनीष काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, योगेश काळभोर व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय पवार आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
--
लोणी काळभोरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण या पदाचा वापर करणार आहोत. ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठे बांधकाम व्यावसायिक व विविध व्यवसाय यावेत यासाठी रस्ते व पुरेसे पाणी या पायाभूत सुविधा देण्याबरोबरच, ग्रामपंचायतीचा कारभार भयमुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. विविध व्यवसाय आल्यास रोजगार वाढणार आहे. आमदार अशोक पवार व माधव काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य मानसाला न्याय देण्याचे काम सरपंचपदाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
राजाराम काळभोर,
सरपंच
--
गावातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. ज्येष्ठ नेते माधव काळभोर व विलास काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते, पिण्याचे पुरेसे व शुध्द पाणीवाडीवस्त्यावर पोचवण्यासाठी काम करणार आहे. महिलांना ग्रामपंचायती दरवाजा कायम उघडा व भयमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ज्योती काळभोर, उपसरपंच