इंदापूर : राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील अनेक गरीब, वंचित, मागासलेल्या लोकांसाठी लोककल्याणकारी राज्य उभे केले. तहयात त्यांनी हे कार्य केले आणि भारतीय जनतेसमोर एक आदर्श ठेवला. असे प्रतिपदान बामसेफचे राष्ट्रीय महासचिव प्रा. डी. आर. ओहोळ यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीदिनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे उपस्थित होते.
ओहोळ म्हणाले की, काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही, हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचविण्यासाठी धोरणे आखून अंमलात आणली. समाजातील शोषित, मागासवर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांची होती. प्रत्यक्षात ती त्यांनीच अंमलात आणली. बहुजन समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये शाहू महाराजांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला. पण त्यांनी या विरोधाला न जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले.
छत्रपती शाहू महाराज हे एक अग्रगण्य समाजसुधारक होते. शाहू महाराजांना बहुजनांचा कैवारी या नावाने ओळखले जाते. बहुजन समाजात असणाऱ्या रूढी, प्रथा व परंपरा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासाठी शाहू महाराजांनी अविरत कार्य केले. बहुजन महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन हे सर्व लोकांनी मिळून मिसळून करावे.
यावेळी उपप्राचार्या सविता गोफणे, भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. बनसुडे, दिपक मगर, आकाश देवकाते , सचिव ॲड. समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. कार्यक्रमस्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली.
-
फोटो क्रमांक : २८ इंदापूर भीमाई आश्रम फोटो क्रमांक :
फोटो ओळ : भिमाई आश्रम शाळेत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना.