वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 09:41 PM2024-04-17T21:41:22+5:302024-04-17T21:44:13+5:30
"वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते. वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्यांनी एकट्यानेच केलाय, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा."
बारामती : बारामतीत आलेला विकास निधी एकत्रित होता. त्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा देखील निधी होताच, कदाचित राज्य सरकारमध्ये असल्याने अजित पवारांचा अधिकचा निधी आला असेल हे मान्य आहे; पण स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला. वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते. वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्यांनी एकट्यानेच केलाय, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा, असा टोला कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र पवार यांनी भूमिका मांडली. पवार म्हणाले, आम्ही अजितदादांचा प्रचार केला नाही, असे अजिबात नाही. त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून अगदी सायकलवर फिरून आम्ही प्रचार केला आहे. त्यांच्या प्रचारात आम्ही फिरलो की नाही, हे बारामतीकरांना माहिती आहे, त्यांना आता सोयीस्कर विसर पडला त्याला कोण काय करणार, छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून आम्ही प्रचार करतोय, गेल्या निवडणुकीत रोहित पवार कर्जत जामखेेडमध्ये उभे होते. त्यामुळे आम्ही तिकडे जोर लावला होता; पण त्या अगोदरच्या निवडणुकीत आम्ही घर ते घर असा प्रचार केला आहे. एक दोन निवडणुकीत आम्ही नसलो तर गेल्या ३५ वर्षांतील निवडणुकीत आम्ही नाही, असे ते म्हणणार असतील तर मग काय बोलायचे. त्यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याला मोरगावमध्ये तासभर का बोलावे लागते याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असा टोलादेखील राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
ते पुढे म्हणाले, पवार कुटुंबात सामाजिक कामे व राजकीय कामे कोणी करायची हे आधीच ठरले होते. सामाजिक कामे आम्ही करत राहिलो. राजकीय कामे ते करत राहिले. त्यामुळे ते लोकांच्या समोर राहिले. कोणी कोणाच्या कामात लुडबुड करायची नाही, हे देखील ठरले होते. त्यामुळे आम्ही राजकारणात नव्हतो, असेही ते म्हणाले.