पाटस: दौंड तालुकूयातील पाटस येथील तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश पांडुरंग लाड याला खंडणीप्रकरणी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. दरम्यान या स्वंयघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या ञासाला पाटसचे ग्रामस्थ कंटाळलेले असल्याची वस्तुस्थिती आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टविनायक रस्त्यावरील पारगाव ते दौंड मार्गावरील मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. या कामाकरिता अंकुश रामचंद्र वणवे यांचे टिपर हे रोटी येथून दौंड तहसीलदार यांनी रितसर परवानगी दिल्याने वाहतुक करून रोडच्या कामावर खाली करत होते.
मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास टिपरचालक संतोष भुजबळ हे बेटवाडी परिसरात टिपर मोकळया जागेत लावण्यासाठी गेल्यावर राजेश लाड याने भुजबळ यांना दमदाटी केली. यावेळी वणवे आले असता त्यांना दमदाटी करत मला एक लाख रुपये दे नाहीतर तुझा टीपर मुरमावर कसा चालतो तेच पाहतो. याबाबत अकुंश वणवे यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने राजेश पांडुरंग लाड या तोतया विरोधात जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे.