हॉटेलमध्ये फक्त पार्सल सेवा देण्याच्या सूचना असताना, हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून, पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी एकत्र करून हॉटेल पदार्थ विक्री केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी महामार्गावर आठ हॉटेल चालकांवर कारवाई केली. याबाबतचा अहवाल तहसीलदार भोर अजित पाटील यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.
राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पुणे सातारा महामार्गावरील हॉटेलची तपासणी केली. यामध्ये किकवी येथील हॉटेल हर्षराज, धांगवडी येथील हॉटेल ताऊजी व सिध्दी, निगडे येथील हॉटेल महाराजा, खेड शिवापूर येथील हॉटेल कैलास, वेळू येथील हॉटेल दुर्गा, आर. के. फुडमॉल, हॉटेल गणेश प्रसाद या आठ हॉटेलचालकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून, गर्दी करून खाद्य पदार्थाची विक्री करताना आढळल्याने त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी राजगडचे निरीक्षक संदीप घोरपडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे सर्वांनी पालन केले करावे. कोठेही गर्दी करण्यास परवानगी नाही. हॉटेल व्यावसायिकांनी फक्त पार्सल सेवा द्यावी अन्यथा अजूनही कारवाई केल्या जातील.