भीमानदीच्या पात्रातील पाणी दूषित झाले आहे. पाणी हिरवे बनत चालले आहे तसेच जलपर्णी पाण्यावर वाढली आहे. कचरा, प्लॅस्टिक यासोबतच शहरातील सांडपाणीही नाल्याद्वारे नदीच्या पात्रात मिसळत असल्याने परिसरातील दुर्गंधीत वाढ होत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, सिंचनाला पाणी मिळावे या उद्देशाने भीमा नदीच्या पात्रात बंधारे बांधण्यात आले. बंधाऱ्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला आहे. वाहणारे पाणी एका जागी स्थिर झाल्याने प्रदूषणाची वाढ झपाट्याने होत असल्याचे चित्र दिसत आहे.
राजगुरुनगर शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरीकरणाचा वेग वाढला, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश होत आहे नदीचे किनारे नष्ट होऊ लागले, तिचे काठ सिमेंटने बांधले गेले. भीमानदीत सांडपाणी, मैलापाणी सोडले जात आहे. नगर परिषदेने नदीकाठलगतच कचरा डेपो उभारला आहे. यातील काही कचरा नदीपात्रात जात आहे. सांडपाणी, मैलापाणी नदीपात्रात मिसळत असल्याने भीमानदीची गंटारगंगा झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरु लागले आहे. राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही व वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे.
--
फोटो क्रमांक : २७ राजगुरुनगर भीमेची झाली गटारगंगा
फोटो ओळी : भीमानदीपात्रावर जलपर्णी फोफावली असून त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत असल्याचे चित्र दिसत आहे.