राजगुरुनगर: शिरोली परिसरात मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्यांमुळे प्रदूषण वाढू लागल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून वीटभट्ट्या बंद करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजगुरुनगर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
महसूल प्रशासनाला याबाबत निवेदन देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. अखेर आंदोलनकर्त्याने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन घोषणाबाजी सुरू केली. निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर हे आंदोलन कर्त्यांना भेटण्यासाठी आले मात्र तहसीलदार यांच्या शिवाय, आम्ही कोणाशीही चर्चा करणार नाही, अशी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली. यावेळी तहसीलदार वैशाली वाघमारे यांची गाडी बाहेर जाण्यासाठी आली. ही गाडी आंदोलनकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन, तहसीलदार कार्यालयाचे गेटसमोर ठिय्या मांडला. तहसीलदार यांच्या दालनात आंदोलनकर्ते व प्रशासन यांच्यात चर्चा करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव हरेश देखणे रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा संगीता आठवले, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत कदम, जिल्हा उपाध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी आक्रमक भूमिका घेऊन महसूल प्रशासनाला धारेवर धरले. शिरोली खरपुडी रोड येथील, नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या सर्व वीटभट्ट्या बंद करण्यात याव्यात अशी, आग्रही मागणी केली. त्यामुळे सदर वीटभट्ट्या तत्काळ बंद करण्यात येतील असे लेखी आश्वासन वैशाली वाघमारे यांनी दिले.
यावेळी प्रदेश सचिव हरेश देखणे यांच्या अध्यक्षतेखाली व रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भोसले रिपब्लिकन रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास केदारी यांच्या नेतृत्त्वाखाली व पिंपरी-चिंचवड रोजगार आघाडीचे अध्यक्ष अॅड. अरुण सोनवणे, पुणे शहर रोजगार आघाडीचे अध्यक्ष सुनील जाधव, पुणे जिल्हा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हा सचिव स्टिवन जोसेफ, खेड तालुका रोजगार आघाडीचे अध्यक्ष नितीन गायकवाड, मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अमित छाजेड, जिल्हा उपाध्यक्ष शकुरभाई शेख आदी उपस्थित होते.
शिरोली (ता. खेड) येथील वीटभट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण थांबवावे यासाठी आंदोलन करण्यात आले.