राजगुरुनगर (पुणे) : ठेकेदाराकडून आठ हजार रुपयांची लाच घेताना येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख अधिकारी चारुबाला हरडे आणि लेखाधिकारी प्रवीण कापसे या दोघांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने पकडले.
राजगुरुनगर नगरपरिषदेत जुन्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने नव्याने अधिकारी विविध विभागात बदलून आले आहेत. तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नव्याने रूजू झाले आहेत. एका ठेकेदाराने टेंडरनुसार पाणीपुरवठा विभागासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे टेंडर घेतले होते. त्याचे रखडलेले बिल काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या प्रमुख महिला अधिकारी आणि बिल काढण्यासाठी लेखाधिकारी यांच्याकडे बिल मंजूर करण्यासाठी वारंवार चकरा मारल्या. बिल मंजुरीचा धनादेश देण्याबाबत संबंधित अधिकारी आढेवेढे घालत असल्याने अखेर वैतागलेल्या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाशी तक्रार दिल्यानंतर याची शहानिशा करून बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी भर दुपारी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात रक्कम स्वीकारताना ही कार्यवाही करण्यात आली. संबंधित दोघा अधिकाऱ्यांना खेड पोलिस स्टेशनला आणून रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्याची कार्यवाही सुरू होती.