राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेने थकीत वीजबिल असल्याने वीज वितरण कंपनीने पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित केला आहे. सोमवारी (दि. २१) सायंकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला, त्यामुळे शहरातील पथदिवे आणि पाणी योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे.
राजगुरुनगर नगरपरिषदेकडून महावितरण कंपनीला पाणीपुरवठा योजनेचे सुमारे पावणेतीन कोटी रुपये, तर स्ट्रीट लाईटचे ५६ लाख रुपये थकीत वीजबिल येणे आहे. २०१४ मध्ये नगरपरिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून थकीत राहात गेलेले हे बिल आहे. वीजबिल भरणा होत नसल्याने मार्च महिन्यात महावितरणकडून अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी होणाऱ्या त्रासाला कंटाळून शहरातील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले होते. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न तात्पुरता मिटवला होता. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने तीन टप्प्यात १ कोटी रुपये वीज भरणा केला होता. पुन्हा काही महिन्यात तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोरोना असल्यामुळे नगरपरिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण प्रशासक म्हणून नगर परिषेद वर कामकाज पाहत आहे.
कोट
नगर परिषद कार्यालय, शहरातील पथदिवे व पाणीपुरवठाचे नियमित वीजबिल भरणा नगरपरिषद करीत आहे. उत्पन्न कमी व मोठी रक्कम असल्याने थकीत वीजबिल भरणा वेळेवर होत नाही. याबाबत प्रशासकीय स्तरावर ऊर्जा मंत्र्यांकडे बिलमाफीसाठी प्रयत्न नगर परिषद करणार आहे.
- सुनील निकाळजे, विद्युत अभियंता, नगरपरिषद
चौकट
नगरपरिषद प्रशासनाशी वारंवार चर्चा करूनही वीजपुरवठा खंडित केला. तेव्हापासून म्हणजे गेले दोन महिने सर्व विभागांचे मिळून सुमारे सहा लाख रुपयांचा वीजबिल भरणा नियमितपणे होत आहे.
- अविनाश सावंत, सहायक अभियंता, राजगुरुनगर विभाग महावितरण कंपनी.