पुणे - काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो शेअर करत आठवणी जागवल्या जात आहेत.
काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करुन सातव यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर, आता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ''राजीव सातव यांचं पार्थिव थोड्यात वेळात पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचं मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी उद्या 17 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,'' अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. यावेळी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच स्थानिक काँग्रेस नेते मोहन जोशी दीप्ती चवधरी कमल व्यवहारे ऊपस्थित होते. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता कळमनुरी या त्यांच्या गावात अंत्यसंस्कार होतील.
सातव यांच्या निधनानंतर ट्विटरवर दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. खासदार शरद पवार यांनीही ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. देशातील काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त करत ही मोठी हानी असल्याचं म्हटलंय.
सातव यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर, रविवारी त्यांचे निधन झाले. काँग्रचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
रितेश देशमुख यांचं ट्विट
राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. या घटनेनं मला अतिशय दु:ख झालं असून ते शब्दात व्यक्तही करता येणार नाही. सातव यांचं नेतृत्व तरुण आणि स्फोटक होतं, मोठं राजकीय करिअर त्यांच्यासमोर उभा होतं. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली... त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याच ताकद मिळो, असे ट्विट रितेश देशमुख यांनी केलंय.
शरद पवार यांचं ट्विट
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलंय.
अलविद मेरे दोस्त...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शोक व्यक्त करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. निशब्द... आज माझ्यासाठी, तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली, काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हानी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त !, असे ट्विट करत नाना पटोले यांनी दु:ख व्यक्त केलंय.