लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हिंगोलीचे दिवंगत खासदार राजीव सातव यांचे आजोळ पुण्यात होते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाल्याने पुण्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
सिटीपोस्टमध्ये महाराष्ट्र तरुण मंडळाजवळ राजीव यांचे मामा प्रताप वाघ यांचे घर आहे. मंदार वाघ त्यांचे मामेभाऊ. शालेय शिक्षणासाठी काही वर्षे राजीव पुण्यात राहिले होते. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातही ते होते. आय.एल.एस.च्या विधी महाविद्यालयातही ते होते. फर्ग्युसन व विधी महाविद्यालयात असतानाच त्यांच्या सामाजिक कामाची मुहूर्तमेढ झाली. राष्ट्रीय सेवा योजनेत ते काम करत. सूस गावात त्यांचे निवासी शिबिर होते. आताचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे त्यांचे याच गावात मित्र झाले. ती मैत्री त्यांनी अजून कायम ठेवली होती, असे चांदेरे यांनी सांगितले. पुण्यात आले की अगदी आवर्जून भेट घ्यायचे, असे ते म्हणाले.
समीर शेख हे सातव यांचे बुधवार पेठेतील लहानपणीचे मित्र. त्यांचे अजूनही घरगुती संबंध आहेत. त्यांच्याबरोबरही राजीव यांनी दोस्ताना कायम ठेवला होता. काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी आल्यानंतर त्यांंनी समीर यांना महापालिकेची पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. एक उमदा तरुण राजकारणी आपण गमावला, असे चांदेरे व शेख यांनी सांगितले.
राजीव यांना जहांगीरमध्ये दाखल केले तेव्हापासून शेख दिवसा व रात्रीही जहांगीरमध्येच थांबत. राजीव यांची प्रकृती सुधारत असल्याने थोडे निश्चिंत झालो होतो. तोच काळाने अचानक घाला घातला, असे ते म्हणाले.
भाजपाचे आताचे नगरसेवक हरिदास चरवड इंजिनिअरिंग महाविद्यालयात होते व राजीव विधी महाविद्यालयात. दोघेही काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचे काम करत. चरवड यांनीही राजीव यांच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी काँग्रेसचे ते राज्य अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवत सरचिटणीस पद दिले होते, असे चरवड यांनी सांगितले.