पुणे : राज्य शासन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवीत आहे. राज्य मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते तयार करताना प्लॅस्टिकचा वापर करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी लागणारे प्लॅस्टिक हे महिला बचतांकडून खरेदी केले जाणार आहे. कुटुंबाचा आर्थिक आधार बनल्यास महिलांना समाजात मानसन्मान मिळेल, असे मत राज्याच्या महिला व बाल विकास तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. राज्याचा ग्राम विकास विभाग आणि पुणे जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रामीण जीवनज्योत अभियान अंतर्गत ग्रामीण कारागीर, स्वयंसाह्यता समूहांची उत्पादने व खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन (दख्खन जत्रा) तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा झाला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार माधुरी मिसाळ, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या आशा बुचके उपस्थित होत्या. मुंडे म्हणाल्या, की गावातील कचऱ्यातील प्लॅस्टिक वेगळे करून रस्ता बनवण्यासाठी देता येणार आहे.
कार्यक्रमाकडे पदाधिकाऱ्यांची पाठदर वर्षी दख्खन जत्रेचे पुणे जिल्हा परिषद आणि राज्याच्या ग्राम विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील २५० पेक्षा जास्त बचत गट या जत्रेत सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि विरोधी पक्षनेत्या आशा बुचके हे दोघेच फक्त उपस्थित होते. इतर पाच समित्यांच्या सभापतींनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची कार्यक्रमात चर्चा रंगली होती.