कात्रज : कात्रज येथील राजमाता भुयारी मार्गात रविवारी दुपारच्या वेळेस RMC ट्रक अडकल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. ट्रक अडकल्याने तासभर वाहनांना ताटकळत राहावे लागले. अथक प्रयत्ना नंतर हा ट्रक बाहेर काढण्यात आला. याठिकाणी अवजड वाहनांना बंदी असताना अशी मोठी वाहने खुलेआम वाहतूक करतात कशी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दक्षिण पुण्यातील अनेक भागांना जोडणारा राजमाता भुयारी मार्ग सध्या वाहतूक कोंडी, सतत साचणारे पाणी यामुळे चर्चीला जात आहे. आंबेगाव बु,भारती विद्यापीठ, जांभुळवाडी, दत्तनगर या भागातील रहिवासी राजमाता भुयारी मार्गाचा वापर करत असतात. राजमाता भुयारी मार्गापासून पुढे निलायम थिएटर पर्यंत पर्यायी रस्ता असल्याने नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु दररोज सकाळी व संध्याकाळी नागरिकांना या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नागरिक प्रचंड संतप्त आहेत. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा फटका भारती विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये येणारे पेशन्ट त्यांचे नातेवाईक तसेच भारती विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थी यांना देखील होत आहे.
''गेल्या पाच वर्षापासून राजमाता भुयारी मार्गासंदर्भात पाठपुरावा करत आहे. हा मार्ग रुंद होणे तसेच याची उंची वाढवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री अडकल्याने जर चांदणी चौकाचे गांभीर्य लक्षात येत असेल तर हजारो नागरिक रोज वाहतूक कोंडीत अडकतात त्याचे काय? लवकरात लवकर याचा विकास करून नवीन भुयारी मार्ग करून वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी. - युवराज बेलदरे माजी नगरसेवक.''