'काँग्रेस ज्याच्या गळ्यात पडली, ते बुडणार' राजनाथ सिंह यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 12:38 PM2024-11-17T12:38:52+5:302024-11-17T12:50:43+5:30
सध्या काँग्रेसची स्थिती वाईट आहे. ते ज्यांच्या गळ्यात पडतील, त्याचे बुडणे निश्चित आहे.
पुणे : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. काही महिन्यांपूर्वी येथे आणि हरयाणामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए सरकारला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत हरयाणामध्ये एनडीए सरकारला लोकांनी पसंती दर्शवली आहे. अन् तोच इतिहास महाराष्ट्रातही घडेल, महायुतीची सत्ता येईल, असा मला विश्वास आहे. देशात आजवर जास्त काळ काँग्रेसचं सरकार होतं. तरीदेखील त्यांना गरिबी आणि बेरोजगारी कमी करता आलेली नाही, अशी टीका देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
ते पुढे म्हणाले,'देशात बरीच दशके काँग्रेसचे सरकार होते. मात्र, सध्या काँग्रेसची स्थिती वाईट आहे. ते ज्यांच्या गळ्यात पडतील, त्याचे बुडणे निश्चित आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गळ्यात काँग्रेस पडली आहे, त्यामुळे त्यांचेही बुडणे निश्चित आहे.' असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी सिद्धांतासोबत तडजोड केल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपा-महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ गोळीबार मैदान येथे आयोजित जाहीर सभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही. मात्र, सध्या काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाबद्दल खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. वास्तविक ज्या बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र जन्मभूमी, कर्मभूमी आहे, त्या महाराष्ट्रात काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांना योजनाबद्धरीत्या निवडणुकीत हरवले होते. आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. काँग्रेसच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवा होता. मात्र, तो काँग्रेसने दिला नाही.
दिलीप कांबळे म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा गेली १० वर्ष विकास करत असताना अनेक प्रश्न आम्ही पुणे महानगरपालिका आणि महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावले आहेत. मग तो घोरपडीचा उड्डाणपूल असेल, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल.
आज भारताला पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी येत्या मतदानावेळी कमळासमोरच बटण दाबून विकासाला मतदान करा. सुनील कांबळे म्हणाले, महायुती सरकारने आजवर केलेले काम आणि विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. तेव्हा येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं मत गुन्हेगारांना पोसणाऱ्या उमेदवाराला द्यायचे का माझ्यासारख्या काम करणाऱ्या लोकप्रतीनिधीला द्यायचे? याचा मतदारांनी विचार करावा, असे आवाहन केले.