पुणे : एखाद्या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्याएेवजी काहीजण फाेटाे अाणि व्हिडीअाे काढण्यात मग्न असतात. नकाे त्या पाेलीस स्टेशनच्या अाणि काेर्टाच्या फेऱ्या असे म्हणत जखमींना तश्याच अवस्थेत साेडून निघून जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. अपघात झाल्यानंतर बघ्यांच्या झालेल्या गर्दीत माणुसकी शिल्लक असलेला एकजण असताे, जाे त्या जखमींना रुग्णालयात दाखल करताे. पुण्यातील राजू हे त्या माणुसकी शिल्लक असलेल्यांमधील एक अाहेत.शिवाजीनगर भागात राहणाऱ्या राजू यांनी अात्तापर्यंत दाेनशे ते अडिचशे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले असून त्यांच्या याच कार्याल सलाम करत शिवाजीनगरचे तत्कालिन पाेलीस निरिक्षक महेश सरतापे यांनी त्यांच्या या कार्यावर डाॅक्युमेंटरी तयार केली अाहे. या डाॅक्युमेंटरीला राष्ट्रीय तसेच अांतरराष्ट्रीय स्तरावर गाैरविण्यात अाले अाहे.
राजू यांनी गेल्या 22 वर्षात विविध अपघातांमधील 200 ते 250 लाेकांचे प्राण वाचविले अाहेत. तसेच नदी पात्रात वाहत आलेल्या शेकडो मृतदेह त्यांनी पोलिसाना काढून दिले आहेत. राजू यांची शिवाजीनगर भागात भुर्जी पावची गाडी अाहे. वयाच्या 24 वर्षापासून ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येत अाहेत. राजूंचे वय अाता 45 अाहे. अाजपर्यंत जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले अाहे. एक प्रकारे समाजसेवेचा विडाच राजू यांनी उचलला अाहे. अपघातग्रस्ताला मदत करुन त्याला रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत ते त्याला याेग्य उपचार मिळतील या सगळ्याची खबरदारी राजू हे घेत असतात. त्यांच्या या कार्याला समाजापर्यंत पाेहचविण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गाैरव करण्यासाठी तसेच त्यांच्यासारखे असंख्य राजू समाजात निर्माण व्हावेत यासाठी शिवाजीनगर पाेलीस स्टेशनचे तत्कालिन पाेलीस निरिक्षक अाणि सध्या मुबई सीअायडीमध्ये कार्यरत असलेल्या महेश सरतापे यांनी राजू यांच्यावर डाॅक्युमेंटरी फिल्म करण्याचे ठरविले. गेल्या तीन वर्षात राजू यांनी अपघात ग्रस्तांचे वाचविलेले प्राण, नदीतून पाेलीसांना काढून दिलेले मृतदेह अशा अनेक प्रसंगाचे लाईव्ह शूट करण्यात अाले. त्याचबराेबर अनेकांच्या राजू यांच्याबद्दलच्या प्रतिक्रीया या डाॅक्युमेंटरीसाठी घेण्यात अाल्या. सरतापे यांनी दिग्दर्शित केलेल्या राजू द सेवियर या डाॅक्युमेंटरीला स्मिता पाटील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, माय मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल अश्या अनेक फेस्टिवल्समध्ये प्रथम क्रमांकाच्या पारिताेषिकाने गाैरविण्यात अाले अाहे.
याबाबत बाेलताना सरतापे म्हणाले, राजू यांनी अात्तार्यंत शेकडाे लाेकांचे प्राण वाचविले असून शेकडाे मृतदेह नदीपात्रातून पाेलिसांना काढून दिले अाहेत. अनेकदा अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यास काेणीही पुढे येत नाही. परंतु राजू हे दुसऱ्याच्या मदतीला नेहमी हजर असतात, प्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करुन ते जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे समाजसेवेचे काम ते गेली 22 वर्षे अविरपणे करत अाहेत. राजूंचे हे काम जगासमाेर यावं, त्याचबराेबर त्यांच्यासारखे अनेक राजू समाजात घडावेत यासाठी त्यांच्यावर डाॅक्युमेंटरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गेल्या तीन वर्षात ते वाचवित असलेल्या अपघातग्रस्तांच्या प्रसंगाचे लाईव्ह शुटिंग करण्यात अाले. या डाॅक्युमेंटरीला अनेक पुरस्कार मिळाले असून सध्या नागरिकांना पाहण्यासाठी ती युट्यूबवरही टाकण्यात अाली अाहे.