पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टी यांनी विधानसभेला वंचित साेबत यावे असे म्हंटले हाेते, यावर बाेलताना भाजपाला टक्कर देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. प्रकाश आंबेडकर यांंनी राजू शेट्टी यांना वंचित साेबत येण्याची दिलेल्या ऑफर बाबत बाेलताना शेट्टी यांनी वंचित साेबत जाणार का याबाबत स्पष्ट बाेलण्याचे टाळत सत्तासंपत्ती याला टक्कर देण्यासाठी, प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणाऱ्यांनी एकत्र यावे अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले . तसेच विधानसभेला काेणासाेबत जायचं याबाबत स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले, एनडीएच्या विराेधातली स्वाभिमानी शेतकरी संघटनेती भूमिका आहे. आत्ताची आघाडी ही लाेकसभेची हाेती. विधानसभेचं काय करायचं याबाबत राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन ठरवण्यात येईल. परंतु आमची केंद्र आणि राज्य सरकारला विराेध करण्याची भूमिका कायम राहणार. ही दाेन्ही सरकारे शेतकऱ्याला न्याय देण्यात अपयशी ठरल्या आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीमध्ये 70 हजार रुपये खर्च केले गेले. देशावर सर्वाधिक कर्ज भारतीय जनता पक्षाने केले आहे. सत्तासंपत्ती याला टक्कर देण्यासाठी, प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणाऱ्यांनी एकत्र यावे अशी भूमिका आमची कालही हाेती आणि आजही आहे. जर खराेखरच त्यांना टक्कर द्यायची असेल तर सर्वांनी एकत्र यायची गरज आहे.
ईव्हीएम बाबत शेट्टी म्हणाले, जगभरातील सर्वच विकसीत राष्ट्रांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका हाेतात. ईव्हीएमवरुन बॅलेटवर आलेले अनेक राष्ट्र आहेत. त्यामुळे जगातील सर्वात माेठी लाेकशाही असलेल्या आपल्या देशात बॅलेटवर मतदान घेण्यास हरकत काय अशी माझी भूमिका आहे. निवडणुक आयाेग लाेकांच्या शंका दूर करण्यात अयशस्वी ठरले आहे. जवळजवळ 250 पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि माेजलेले मतदान यात फरक आहे. ताे फरक कसा आला याबाबत निवडणुक आयाेग स्पष्टीकरण देत नाही. अनेक राजकीय पक्षांनी जामर बसविण्याची मागणी केली हाेती, ती फेटाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणावरुनच इव्हीएम का आणले जातात अशी अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय निवडणुक आयाेगाला निवडणुका या पारदर्शक वातावरणात घेतल्या आहेत, असा दावा करता येणार नाही.
दुष्काळ निवारणाच्या अगदी तकलादू उपाययाेजना सरकार करत आहे. त्यातून शेतकऱ्याला न्याय नाही. पाण्याची वणवण आहे. राेजगार हमी याेजनेची कामं सुरु नाहीत. राज्यकर्त्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. हवामान विभागाचे कान उपाटण्याची गरज आहे. दरराेज वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. पाऊस येणार की नाही आला तर जाणार का याबाबत निटसं सांगितलं जात नाही. बियाणे आणि औषध कंपन्यांच्या फायद्यासाठीच हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात का असा प्रश्न निर्माण हाेताे. असेही शेट्टी यावेळी म्हणाले.