लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील बारा आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “यात कोणतेही तथ्य नाही. राज्य सहकारी बँकेच्या संबंधितांवर ईडी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखवली. परंतु ही बातमी धादांत खोटी, निराधार होती. अशा निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल.”
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार विद्याधर अनास्कर यांनी शुक्रवारी (दि. ३) स्वीकारला. या वेळी पवार उपस्थित होते. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.
भाजप आणि मनसे राज्यात मंदिरे सुरू करण्याबाबत आक्रमक झाली आहेत. या संदर्भात पवार म्हणाले, “कोणी किती आक्रमक व्हावे, हा त्यांचा प्रश्न आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार. सध्या मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करून काही साध्य करता येईल का, याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.”
देशातील काही इतर राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय, यावर पवार म्हणाले, “कोरोनामुळे सध्या दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात, असा मतप्रवाह आहे. तर पॉझिटिव्हिटी दर शून्यावर आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असा दुसरा मतप्रवाह आहे. याबाबत मुख्यमंत्री कृती दलाशी चर्चा करून शाळा नक्की कधी सुरू करायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतील.”