नीरा : राज्य सरकारने ग्रामीण भागातील पथदिवे सोलर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी तशी घोषणाही केली आहे. आता अनेक गावे सौरऊर्जा वापरतील. यामध्ये पुरंदर तालुक्यातील राख गावाने आघाडी घेतली आहे. पथदिव्यांसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील दुसरे आणि राज्यातील पहिले गाव हे पुरंदर तालुक्यातील राख असणार आहे.
याबाबतची माहिती राख येथील महेंद्र माने यांनी दिली. नेट मेटरींगच्या माध्यमातून दिवसभरात तयार झालेली वीज दिवसा महावितरणला दिली जाणार आहे, तर रात्री पथदिव्यांसाठी पुन्हा महावितरणाकडून वीज घेतली जाणार आहे. दररोज १,५०० युनिट वीज यातून निर्माण होणार असून, रोज तेवढीच वीज महावितरणकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला शून्य बिल येणार आहे.
१२० खांबांद्वारे गाव उजाळणार आहे. ५२ लाख ५० हजार रुपयांचे हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या फंडातून हा राज्यातील पहिला प्रकल्प असून, जानेवारी महिन्यात याचे उद्घाटन होणार आहे. सध्या राखमलस्वामी मंदिर, आरोग्य उपकेंद्र, महादेव मंदिर, स्मशानभूमी, माने वस्ती असे २.५ किलोमीटर रस्त्याच्या शेजारी खांब उभे करण्याचे काम सुरू आहे.
‘थकित वीजबिलांमुळे ग्रामपंचायती मेटाकुटीला आल्या आहेत. कमी लोकसंख्येच्या व भौगोलिक परिसर मोठा असलेल्या गावांना कर कमी येत असतो. वीज देयके अधिक थकल्याने थकबाकीचा फुगवटा वाढत आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे सोलर प्रकल्प आहे. शासनाने असे प्रकल्प गावोगावी राबवावेत.’
- महेंद्र माने, चेअरमन, राख विकास सोसायटी