अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:22 AM2024-08-19T10:22:26+5:302024-08-19T10:23:45+5:30

दोनही नेते संपूर्ण दिवसभर आपापल्या राजकीय दिनक्रमात व्यस्त असणार आहेत

Raksha Bandhan 2024 will Ajit Pawar and Supriya Sule celebrate festival today with Rakhi tie | अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती: रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यांच्या बंधाचा अनोखा दिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्येकजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सर्वसामान्यांसह बडे राजकारणी, नेते, मंत्रीदेखील याला अपवाद नाहीत. यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या रक्षाबंधनाच्या सणाची चर्चा रंगली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी दोघे बहिणभाऊ दिवसभर आपापल्या राजकीय दिनक्रमात व्यस्त आहेत, त्यातून उशीरा का होइना वेळ काढत या दोघांचे रक्षाबंधन साजरे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडली. त्यानंतर राजकारणासह नात्यांचे संदर्भ देखील बदलण्यास सुरवात झाली. या फुटीनंतर पवार कुटुंबीयांनी दिवाळी सण एकोप्याने साजरा केला. त्यावेळी राष्ट्रवादीची फूट नात्यांसमोर निरर्थक ठरली. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाऊबीज उत्साहात साजरी केल्याचे चित्र होते. पक्षात फूट पडल्यानंतर देखील पवार कुटुंब तेवढेच कुटुंबवत्सल असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले होते.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उतरवले. दोघा बहिण भावांनी एकमेकांविरोधात लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारात जोरदार टीका केली. तसेच सुळे यांनी पवार यांचा पराभव केला. त्यानंतर मात्र या बहीण भावांच्या नात्यात काहीशी कटूता निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेवरुन खासदार सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

या दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहिणीच्या विरोधात पत्नीला निवडणुकीला उभं करायला नको होतं अशी कबुली दिली. पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यानंतर माघारी घेता येत नाही. मात्र, माझं मन मला सांगतय, की तसं नको व्हायला होतं, अशा शब्दात अजित पवारांनी खंत व्यक्त केली हाेती. रक्षाबंधन सणाच्या काही दिवस अगोदर उपमुख्यमंत्री पवार यांनी भाऊ बहिणीच्या नात्यांचे बंध अधोरेखित केले होते. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंकडे जाणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांनी माझा राज्यभर दाैरा सुरु आहे. मात्र, राखीपोर्णिमेला मी जर बारामतीत असेन आणि माझ्या बहिणी तिथे असतील तर मी नक्कीच जाईन, असं उत्तर दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार आणि खासदार सुळे यांचे रक्षाबंधन साजरे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी संपूर्ण दिवस मुंबईत आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने नाशिक दाैऱ्यावर आहेत. त्यामुळे आपापल्या राजकीय दिनक्रमात व्यस्त असणाऱ्या आणि राज्यातील बडे राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या या दोघा बहीण भावंडांना रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास वेळ मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे छरणार आहे.

Web Title: Raksha Bandhan 2024 will Ajit Pawar and Supriya Sule celebrate festival today with Rakhi tie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.