भिगवण : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण साजरा करीत असताना केरळमधील भगिनी आणि बांधव आस्मानी संकटांचा सामना करीत आहेत. त्यांची मदत व्हावी यासाठी भिगवण येथील जैन आणि मारवाडी समाजाने राखी बांधण्याचा सामुदायिक कार्यक्रम आयोजित करीत १ लाख रुपयाची मदत केरळमधील पूरग्रस्तांना दिली. जैन भगिनी आणि बांधवांनी केलेले काम परिसरातून नावाजले जात आहे. त्यांची प्रेरणा घेत अनेकांनी मदतीसाठी पुढे पाऊल टाकण्याचा निश्चय व्यक्तकेला आहे.
भिगवण परिसरात अत्यंत शांत आणि संयमी असणाऱ्या जैन समाजाने हा सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम जैन स्थानक येथे आयोजित केला होता. राखीसाठी बहिणींनी जास्तीचा खर्च न करता त्यातून वाचलेली रक्कम मदतीसाठी दिली. तर आपल्या भगिनीला भावाने भेट द्यायचे टाळून ती रक्कम पुरामुळे पीडित असलेल्यांसाठी जमा करण्यात आली.यातून थोडेफार नाही तर १ लाख रुपये जमा झाले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन बोगावत, अभय रायसोनी, कमलेश गांधी, संजय रायसोनी, चेतन बोरा या जैन बांधवांनी केले. तसेच जैन व मारवाडी समुदाय उपस्थित होता.