पुणे - मागील महिन्यात काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाचं कमळ हाती घेतलं. त्यानंतर, आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आशा बुचके यांच्या कन्या ज्योती दुरापे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांनी राखी बांधून घेतली. या ना त्या सणाच्या निमित्ताने नाती घट्ट होतात, हे हिंदू धर्माचं वैशिष्ट असल्याचंही पाटील यांनी यावेळी म्हटलं.
मुंबईतील सानपाडा येथे माझी एक बहिण आहे, भांडुप येथे एक बहिण आहे आणि एक साताऱ्याला आहे. प्रतिक्षा नगरला एक बहिण होती, तिचा कॅन्सरने मृत्यू झाला. माझ्या प्रवासामुळे सख्ख्या बहिणींकडे जाणं मला शक्य झालं नाही. त्यामुळे, नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या आशाताई बुचके यांची कन्या अॅड. ज्योतीताई दुरापे यांनी सकाळी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी, हे आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट असल्याचं सांगत, आग्रहाने मी प्रदेश कार्यालयात ज्योतीताईला बोलावलं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात ज्योती दुरापे यांच्याकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर, सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी, जनआशीर्वाद यात्रा, कोरोना आणि मंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीबद्दलही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. त्यावरही, पाटील यांनी उत्तरे दिली. कोण आहेत आशा बुचके
जुन्नर विधानसभा निवडणुकीत आशा बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. याठिकाणचे तत्कालीन मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जुन्नर मतदारसंघातून शिवसेनेने सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आशा बुचके शिवसेनेवर नाराज झाल्या. नारायणगावच्या पदाधिकारी मेळाव्यात आशा बुचके यांनी सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव आणि विधानसभेत घेतलेली भूमिका यामुळे आशा बुचके यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला.