जेजुरी : आपल्या आयुष्याची शंभरी पार करणाऱ्या भावाबहिणीनं अतिशय आनंदात रक्षाबंधन साजरं केलं आहे. पुरंदर तालुक्याच्या जेजुरीमधील १०४ वर्षाच्या बहिणीनं आपल्या १०२ वर्षाच्या भावाला राखी बांधली आहे. भारतीय संस्कृतीतील बहीण भावाच्या नात्याला उजाळा देणारा सण हा वर्षातून एकदा येतो. आयुष्याच्या शंभरी नंतर ही हा गोडवा कायम असल्याचे आज पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे पाहायला मिळाले.
लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणीची प्रत्येक भाऊ या दिवशी वाट पाहत असतो. आणि बहिण ही भावाच्या मायेने त्याच्या हातावर राखीचा धागा बांधण्यासाठी धावत पळत येत असते. याचाच प्रत्यय आज येथे पाहायला मिळाला. वयाची शंभरी पार केलेल्या भाऊ बहिणींनी रक्षाबंधन सण साजरा केला.
सटलवाडी येथील १०२ वर्षाचे गजानन कदम यांच्या हातावर १०४ वर्षाच्या अनुसया ज्ञानोबा गायकवाड यांनी राखी बांधली. आणि त्या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचबरोबर त्यांच्या नातवंडांनी सुध्दा हा क्षण पाहून आनंद व्यक्त केला आहे. या आनंदाच्या क्षणात कुटुंबीयही सहभागी झाले होते. नातवंडे आजीबाईंना आज ही आणतात माहेरी
अनुसयाबाई आता १०४ वर्षाच्या झाल्या आहेत. वयोमान त्यांना आता स्वतः माहेरी येणे शक्य नाही. परंतु त्यांची नातवंडे किंवा परतुंडे त्यांना रक्षा बंधनासाठी अजूनही घेऊन येतात. आजीबाईंचा गोतावळा मोठा आहे. यातील कोणीतरी त्यांना रक्षा बंधनासाठी आवर्जून घेऊन येते.