पुणे : महापालिकेच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या रॅलीला अल्प प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी भाजपाच्या बहुसंख्य नगरसेवकांनी या रॅलीकडे पाठ फिरवली. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचाही फटका या रॅलीला बसला. रॅलीला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे दीड हजार व्यक्तींसाठी बनविण्यात आलेला नाष्टा वाया गेला.महापालिकेच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष यंदा साजरे केले जात आहे. या महोत्सवाच्या जनजागृतीसाठी पालिकेच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या कार्यकर्त्यांसह रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपाचे केवळ ९ नगरसेवक या रॅलीसाठी आले होते. कार्यकर्ते खूपच कमी संख्येने रॅलीसाठी आले. विरोधी पक्षांकडून या रॅलीमध्ये सहभाग घेतला जाणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते.सकाळी आठ वाजता रॅलीच्या शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायीसमिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपाचे तीन ते चारच नगरसेवक उपस्थित होते. सकाळी नऊच्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मात्र, रॅलीतील सहभागींची संख्या कमी असल्याने अवघ्या तासाभरात रॅली आटोपण्यात आली.महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवासाठी यंदा २ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या रॅलीसाठी दहा लाख रुपयांचीतरतूद करण्यात आली होती. रॅलीसाठी दीड हजार लोक येतीलया अंदाजाने नाष्टा तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षातदोनशेच लोक उपस्थित राहिल्याने मोठ्या प्रमाणात नाष्टा वाया गेला. पावसामुळे रॅलीला कमी प्रतिसाद मिळण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.या रॅलीसाठी प्रत्येक नगरसेवकाने कार्यकर्त्यांसह रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपाचे केवळ नऊच नगरसेवक या रॅलीसाठीआले होते.
रॅलीला नगरसेवकांचीच दांडी, अल्प प्रतिसाद , दीड हजार जणांचा नाष्टा वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 4:24 AM