पुणे : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व संशाेधन विधेयक (एनआरसी) च्या विराेधात देशभरात आंदाेलने हाेत असताना आज पुण्यात 'कुल जमाते तंजिम' या संघटनेच्यावतीने 'संविधान बचाव' माेर्चा काढण्यात आला. पुण्यातील गाेळीबार मैदानापासून या माेर्चाला सुरुवात झाली. या माेर्चात हजाराे मुस्लिम नागरिक सहभागी झाले हाेते. विधानभवन येथे या माेर्चाचे सभेत रुपांतर झाले.
सीएए आणि एनआरसी या दाेन कायद्यांना देशभरात विराेध हाेत आहे. देशभरात विविध ठिकाणी माेर्चे, आंदाेलने हाेत आहेत. हे दाेन्ही कायदे संविधानाच्या विराेधात असल्याचे म्हणत ते मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आज पुण्यातील 'कुल जमाते तंजिम' या संघनेकडून 'संविधान बचाव' माेर्चा काढण्यात आला. कॅम्प भागातील गाेळीबार मैदानापासून या माेर्चाला सुरुवात झाली. या माेर्चात तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय हाेती. आझादी, इंकलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा आणि भारतीय ध्वज हातात धरण्यात आला हाेता.
यावेळी माेठ्याप्रमाणावर पाेलीस बंदाेबस्त देखील तैनात करण्यात आला हाेता. या माेर्चात विविध सामाजिक संघटनांनी देखील सहभाग घेतला. सीएए आणि एनआरसी हे दाेन्ही कायदे संविधानाच्या विराेधात असून ते मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्रच राहू देण्याची मागणी देखील करण्यात आली. सकाळी 12 वाजता सुरु झालेल्या माेर्चाचे दुपारी 2 च्या सुमारास विधानभवन येथे सभेत रुपांतर झाले.