लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले; पण अद्यापही बँका व एटीएम सेंटर पूर्वपदावर आल्याचे दिसत नाही. शहरात ‘कॅश’ची धोकादायक वाहतूक होत आहे. कॅश व्हॅनची सुरक्षा वाऱ्यावर असून, बँक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे एटीएम व कॅश व्हॅनच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा एजन्सीकडून एअरगनचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील बँका व एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बँकांची कोट्यवधी रुपयांची वाहतूक करणाऱ्या एजन्सीकडून सुरक्षेसाठी एअरगन वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहर पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, सुरक्षेचे मोठे आव्हानही उभे राहिले आहे. शहरात अनेक बँका व त्यांचे एटीएम सेंटर आहेत. त्यानुसार प्रतिदिन अनेक बँकांची कोट्यवधी रुपयांची रोकड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाते. मात्र याकरिता नेमलेल्या एजन्सींकडून खऱ्या बंदुकीऐवजी एअरगन वापरल्या जात आहेत. एअरगन हे सुरक्षेचे शस्त्र नसतानाही त्याचा वापर होत आहे. एअरगन हे खऱ्या बंदुकीसारखे दिसणारे; परंतु पक्षी मारण्यासाठी उपयुक्त हत्यार आहे. त्यामुळे एअरगनधारक सुरक्षारक्षक असलेल्या अशा बँक, एटीएम सेंटर अथवा कॅशव्हॅनवर लुटारूंनी हल्ला केल्यास सुरक्षारक्षक त्यांचा सामना कसा करणार हा प्रश्न पोलीस यंत्रणेसमोर आहे. पोलिसांकडून व्यावसायिक कारणासाठी सुरक्षा रक्षक एजन्सींना शस्त्र परवाना दिला जात नाही. परंतु बँकांना मात्र हा परवाना तत्काळ दिला जातो. त्यानुसार बँकांनी शस्त्र घेऊन नेमलेल्या सुरक्षारक्षकाला पुरवणे आवश्यक आहे. परंतु शहरातील अनेक बँकांनी बेजबाबदारपणा दाखवत खासगी सिक्युरिटी एजन्सीवर सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. मात्र त्यांच्याकडे असलेली शस्रे खरी आहेत की खोटी याची खात्रीही बँकांकडून केली जात नसावी. आठ-आठ तास काम करूनही पगार कमी आहे. गणवेशही मिळत नाही. स्वत:च्या खर्चाने बूट घेतले आहेत. आमच्याकडे लक्ष द्यायला बँकांना वेळ नाही. सुरक्षेसाठी काठी दिली आहे. कधी कधी तीही नसते. मशिन बंद पडले म्हणूनही नागरिक आम्हालाच ओरडतात. अशा स्थितीत आम्ही कोणाची सुरक्षा करू शकणार आहोत, अशी भावना एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सुरक्षारक्षकाने व्यक्त केली.असुरक्षित वातावरणात ग्राहकांचा व्यवहारभोसरी, मोशी, चऱ्होली, दिघी, आळंदी परिसरात पाहणी केली असता, एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांच्या सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. कोणीही या, दरवाजा ढकला आणि आतमध्ये जा, शटर लावून घ्या, अशा पद्धतीने असुरक्षित वातावरणात ग्राहकांना एटीएम हाताळावे लागत असल्याचे पाहावयास मिळाले.असे हवे सुरक्षित दरवाजेएटीएमचा दरवाजा उघडण्यासाठी सुरक्षेबाबतची खबरदारी घेणे आवश्यक असते. या दाराजवळ क्रेडिट-डेबिट कार्ड स्वॅप करण्यासाठी एक छोटी जागा असते. त्यात कार्ड स्वॅप केल्यानंतरच दार उघडणे अपेक्षित असते. ग्राहक एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर दरवाजा अॅटोमॅटिक लॉक व्हायला हवा. एटीएम हाताळल्यानंतर बाहेर पडण्यासाठी आतल्या बाजूस एक बटन असते. ते दाबल्यानंतरच दार उघडते. तोपर्यंत बाहेरील व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही.कळस असुरक्षिततेचानोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भोसरी परिसरातील बहुतेक एटीएम सेंटरवर आॅटोमॅटिक लॉक होणारे दरवाजे कार्यान्वित होते; पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्व सुरक्षा व्यवस्थेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. जवळपास सर्वच ठिकाणी कार्ड स्वॅप करून दार उघडण्याच्या यंत्रणा कुचकामी असल्याचे पाहावयास मिळाले. बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये मॅग्नेटिक डोअर सिस्टिम नादुरुस्त आढळून आली.सुरक्षारक्षक नावालाच भोसरी परिसरात पाहणी केली असता नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांनी नागरिकांची व एटीएमची सुरक्षा करावी, ही अपेक्षा हास्यास्पद ठरावी, अशी त्यांची शरीरयष्टी होती. सुरक्षा करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ काठी आणि शिटी होती. गणवेशही नावालाच होता. सुरक्षारक्षक बँकेने नियुक्त केला आहे का, ही ओळख पटवणारी कागदपत्रेही त्यांच्याकडे नव्हती. काही ठिकाणी तर केवळ झोप काढण्यासाठी आपल्याला बॅँकांनी येथे नेमले आहे, अशा आविभार्वात हे रक्षक होते. सांगवीत एटीएम बंदसांगवी : सांगवी परिसरातील एटीएम रकमेअभावी देखाव्याची केंद्र झाले आहे. या परिसरात वेगवेगळ्या बँकांचे जवळपास ४० एटीएम असून, बहुतांश एटीएममध्ये खडखडाटच पाहायला मिळत आहे. साई चौक, काटेपुरम चौक, जुनी सांगवीतील शितोळे चौक परिसरातील एटीएम बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत असून बँकांचेही व्यवहार न झाल्यामुळे नुकसान होत आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी रोख पैसे जवळ नसल्याने चांगलीच हैराणी झाली आहे. अजूनही चलनाचा तुटवडा१चिंचवड : नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात नोटांचा तुटवडा अजूनही जाणवत आहे. नोटबंदीला सहा महिने झाल्यानंतरही अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत. चिंचवड परिसरातील अनेक एटीएम केंद्रामध्ये पैसे शिल्लक नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पैसे काढण्यासाठी अनेक जण विविध एटीएम केंद्रांवर धावपळ करीत असल्याचे वास्तव सध्या दिसत आहे.2नोटबंदीच्या निर्णयानंतर पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी अनेक बँकेच्या बाहेर ग्राहकांची रांग लागल्याचे दिसत होते. पैसे काढण्यासाठीही निर्बंध लावले असल्याने अनेक एटीएम केंद्रासमोर नागरिक तासन्तास उभे राहत होते. काही दिवसांनंतर पुरेसे चलन बाजारात येईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, नोटांचा तुटवडा कायम असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.3चिंचवडमध्ये विविध बँका व शंभरहून अधिक एटीएम केंद्र आहेत. मात्र बहुतांश एटीएम केंद्रांत पैसे शिल्लक नसल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. एटीएम केंद्रात गेल्यानंतर पैसे नसल्याचे समजत असल्याने नागरिक संतप्त होत आहेत. चार ते पाच एटीएम फिरल्यानंतर पैसे मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत.4कित्येक एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षकही नाहीत. मशिनमध्ये पैसे शिल्लक नसल्याचे फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पैसे कधीपर्यंत एटीएममध्ये उपलब्ध होतील, असे विचारायचे कुणाला हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. या प्रकारामुळे नोटबंदीचा निर्णय होऊनही अच्छे दिन आले नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. लग्नसोहळ्यात होतेय पंचाईतमोशी : नोटाबंदीला सहा महिने पूर्ण झाले, तरी आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आली नसून, बहुतांश बॅँकांच्या एटीएमसमोर ‘तांत्रिक कारणामुळे एटीएम बंद’ असा फलक दिसून येत आहे. लग्नसोहळ्याची सध्या मोठी तिथी आहे. अनेकजण लग्नसोहळ्यासाठी खरेदी करीत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या अधिक होती. कोणत्या एटीएमवर गर्दी कमी आहे, हे पाहण्यासाठी निघालेल्यांना अनेक जणांना मशिन बंदचा फलक दिसत होता. याच प्रकारचे चित्र आजही पाहावयास मिळाले. परिणामी नोकरदारांसह अनेकजण एटीएमच्या शोधातच दिसतात. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर सर्वत्र एक वेगळ्या प्रकारचे चित्र निर्माण झाले होते . चलनात नवीन आलेली दोन हजार रुपयांची नोट जवळ असूनही सुट्या पैशांची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लग्नसोहळ्यात गेलेल्या मंडळींकडून वधू-वरांकडील आहेर नोंदवून घेण्याची यादी असलेल्या ठिकाणाहून सुटे केले जात होते. सध्या पैसे काढण्यासाठी केवळ एटीएमचाच पर्याय आहे. कारण बँकेत आजही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. थेरगावात करावी लागतेय भटकंतीथेरगाव : नोटबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले असतानाही नोटबंदीचा परिणाम जनजीवनावर होत असल्याचे थेरगावमध्ये दिसत आहे़ अनेक बँकांच्या एटीएममध्ये पुरेसे पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ बँकाकडून चोवीस तास दिली जाणारी एटीएम सेवा सध्या अनेक ठिकाणी २४ मिनिटेही सुरू असलेली दिसत नाही. महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार बँकेत जमा होतात़ त्यामुळे बँकेत जमा झालेला पगार काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे धाव घेत आहेत़ पण मशिनमध्ये पैसेच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात कोणत्या एटीएममध्ये पैसे मिळतील हे शोधत फि रावे लागत आहे़ दैनंदिन खर्चासाठी पैसा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत़ स्टेट बँक, आयसीआयसीआय, महाराष्ट्र बँक यांसारख्या मोठ्या बँकांच्या एटीएममध्ये पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत़ नोटबंदीला सहा महिने झालेले असतानाही नोटबंदीचा परिणाम कायम आहे़
एटीएम केंद्रांची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे
By admin | Published: May 08, 2017 2:51 AM